About Future Breath

पुणे - "वनस्पतींचा नाश होत असल्यामुळे शहरांमधील तापमान वाढत आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी शनिवारी येथे केले. ""या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शहरांमध्ये जैववैविध्य उद्याने तयार केली पाहिजेत,'' असा उपायही त्यांनी सांगितला. प्रा. श्री. द. महाजन लिखित "देशी वृक्ष' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट, "नेचर वॉक' संस्थेचे अनुज खरे आणि पराग महाजन उपस्थित होते. डॉ. यादव म्हणाले, ""वनस्पतींबद्दल लोकांची अनास्था वाढत आहे. पश्‍चिम घाटातील दोन हजार वनस्पती विनाशाच्या मार्गावर आहेत. पश्‍चिम घाटातील जैव वैविधतेवर काम करणारी कोणतीही केंद्रीय संस्था नाही. पश्‍चिम घाट हा "हॉटेस्ट स्पॉट' झाला आहे. म्हणजे तेथील सत्तर टक्के जंगल नष्ट झाले आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत आहे. हा सुंदर पश्‍चिम घाट आपण वाचवू शकू का, अशी भीती आहे.'' डॉ. प्रभू म्हणाले, ""पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी स्थानिक वनस्पती वाढविणे आवश्‍यक आहे. देशी वनस्पती ही काळाची गरज आहे.'' माणसांची मनोवृत्ती बदलण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. अवचट म्हणाले, ""निसर्गाचा समतोल राखायचा की, पैसे आणि प्लॅट यातच रहायचे याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.''

Comments

Popular posts from this blog

गांडुळ खत -प्रक्रिया