झाडं लावा...भरपूर झाडं लावा ! (एकनाथ कुंभार)
ज्यांना ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी त्यांनी भरपूर झाडं लावायला हवीत. आपण जितकी जास्त झाडं लावू, तितकी ती कमीच ठरतील! पर्यावरणाच्या रक्षणासाठी, वायुप्रदूषण रोखण्यासाठी, आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी, पाऊसमान वाढवण्यासाठी झाडं लावणंयाला पर्याय नाही. आजच्या (पाच जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडांची महती सांगणारा हा लेख.
- एकनाथ कुंभार
रविवार, 5 जून 2016 - 01:15 AM IST
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Y8FZEP


वृक्षतोडीनं ढग गेले...ढगाविना पाऊस गेला...पावसाविना समृद्धी गेली... इतके अनर्थ वृक्षतोडीनं केले! दुष्काळ, पाणीटंचाई याची झळ आबालवृद्धांपासून सगळ्यांनाच जाणवत आहे. झाडं लावणं, झाडं जगवणं याला कोणताही पर्याय नाही, याची जाणीव जवळपास प्रत्येकालाच आता होऊ लागली आहे; पण या जाणिवेला प्रत्यक्ष कृतीची आणि इच्छाशक्तीची जोड हवी. या वर्षी पाऊस भरपूर होणार, असं भाकीत वेधशाळेनं वर्तवलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येक घटकानं वृक्षलागवडीसाठी पेटून उठलं पाहिजे! १९९६ मध्ये राज्य शासनानं अधिसूचना काढली होती,
की प्रत्येक वर्षी ज्येष्ठा पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा दिवस महाराष्ट्र वृक्ष दिनम्हणून साजरा करण्यात यावा. या वर्षी महाराष्ट्र वृक्ष दिन २० जून रोजी आहे. तेव्हा या वर्षी महाराष्ट्र वृक्ष दिन दणक्‍यात साजरा करायला हवा आणि आपल्या सभोवतालच्या परिसरात भरपूर झाडे लावायला हवीत. वसुंधरेला वाचवण्यासाठी शहरामध्ये व्यक्ती व झाडं यांच्या गुणोत्तराचे निकष ठरवण्यात आले आहेत. समृद्ध पर्यावरणासाठी शहरात एका व्यक्तीमागं चार झाडं हे प्रमाण आदर्श मानलं जातं. (व्यक्ती ः झाडं = १ : ४) अमेरिकेतल्या न्यूयार्क शहरात हे प्रमाण एका व्यक्तीमागं तीन झाडं असं आहे. मुंबईमधलं हे प्रमाण सहा व्यक्तींमागं एक झाड (व्यक्ती ः झाड = ६:१) असं आहे. यावरून मुंबईत झाडांची कितीतरी मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची नितांत गरज आहे, हे अधोरेखित होतं; पण मुंबईतले नागरिक म्हणतात, की झाडं लावायला जागा कुठं आहे? त्यावर उत्तर असं ः जागा शोधा, जागा सापडेल!महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही.

महाराष्ट्र वृक्ष दिनआता काही फार दूर नाही. या दिवशी म्हणजे येत्या २० जूनला रोपे लावण्याच्या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यायला हवं. यासंबंधी शिक्षण मंत्रालयातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत शासन आदेश जायला हवा. प्रत्येक शाळेच्या परिसरात झाडं लावली जावीत. बालमनावर वृक्षमहिम्याचे संस्कार बिंबवणं खूप महत्त्वाचं आहे. नागरी भागात; तसंच ग्रामीण भागात या दिनानिमित्त वृक्षलागवड, रोपमळ्यांचं विस्तारीकरण, परिसंवाद, प्रदर्शनं, बोटॅनिकल गार्डनमध्ये मुलांच्या सहली, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार असे प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम आयोजित व्हायला हवेत.

झाडांचे उपयोग 
झाडांच्या अनेकानेक उपयोगांपैकी काही महत्त्वाचे उपयोग म्हणजे झाडं ऑक्‍सिजननिर्मितीचे कारखाने आहेत. झाडं वातावरणातली तापमानवाढ रोखतात. शहरातली हवा नायट्रोजन ऑक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साइड यांसारख्या आरोग्यास घातक असणाऱ्या वायूंमुळं प्रदूषित झालेली असते. वाहनांमधून धुराच्या स्वरूपात बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्‍साइड श्‍वासाद्वारे फुफ्फुसात आल्यानं रक्ताची शरीरात विविध अवयवांना ऑक्‍सिजन पोचवण्याची क्षमता कमी होऊन हृदय व मस्तिष्क यांसारख्या महत्त्वपूर्ण अवयवाना ऑक्‍सिजन कमी मिळतो. झाडं वरील विषारी वायू शोषून घेतात. मुंबई विद्यापीठाच्या एका संशोधनानं सिद्ध केलं आहे, की झाडांमुळं ध्वनीचाही प्रभाव रोखला जातो. झाडांमुळं पाऊसमान वाढतं.

कोणती झाडं लावावीत?
झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार कोणती झाडं लावावीत, यासंबंधी मार्गदर्शन करणारी पुस्तिका शासनानं प्रकाशित केली होती. महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांत, कोरड्या हवेत, दमट हवेत कोणती झाडं लावावीत, सावली देणारी झाडं कोणती, फळं देणारी झाडं कोणती, शहराच्या सुशोभीकरणासाठी कोणती झाडं याविषयीची माहिती देणारी ही पुस्तिका सध्या उपलब्ध नसल्यामुळं पर्यावरण मंत्रालयानं ही यादी पुनःप्रकाशित करायला हवी.
वृक्षाच्या माध्यमानं मानवाला निसर्गाची अफाट देणगी मिळालेली आहे. शहरी भागांत विविध पक्षी, खार, सरडा, फुलपाखरं अशी सजीवसृष्टी बहरण्याची संधी देण्यासाठी फायकसजातीच्या तीन वृक्षांची लागवड प्रामुख्यानं केली जाणं आवश्‍यक असतं. वड (Ficus spp), पिंपळ (Ficus retusa), उंबर (Ficus glomerata) या तीन झाडांच्या लागवडीचं प्रमाण पाच ते १० टक्के असावं लागतं. वड हा आपला राष्ट्रीय वृक्षआहे. (आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष, केरळचा राज्यवृक्ष नारळ; तर शमी हा राजस्थानचा राज्यवृक्ष आहे).

फायकसजातीचा पहिला वृक्ष म्हणजे वड. हा वृक्ष म्हणजे एक वसाहतच असते. पक्ष्यांना आपलं घरटं बनवण्यासाठी हे झाड ऐसपैस वाटतं. त्यांना एकांत प्राप्त होतो. त्यांना तिथं मानवी किंवा अन्य उपसर्ग नसतो. या झाडाच्या पानांवर फुलपाखरू अंडी सोडतं. पानावरचा हा गोड चिकट पदार्थ खारींसाठी नाश्‍ताअसतो! अलाहाबादमध्ये संगमाजवळ अक्षयवटहा अमरवृक्ष समजला जातो. झाडापैकी मी वटवृक्ष आहे,’ असं श्रीकृष्णानं भगवदगीतेत म्हटल्याचा उल्लेख आढळतो.

फायकसजातीचा दुसरा वृक्ष म्हणजे पिंपळ. गौतम बुद्धांना पिंपळ वृक्षाखाली बोधप्राप्ती झाली, असे उल्लेख आढळतात. हिंदू, बौद्ध व जैन धर्मात या वृक्षाला पवित्र समजलं जातं. श्रीलंकेतल्या एका पिंपळाचे वय दोन हजार २८० वर्षं असल्याची नोंद आहे. आळंदीचा सुवर्णपिंपळ ८०० वर्षांपूर्वीचा आहे, असं म्हणतात. या झाडाच्या पानांपासून तयार होणाऱ्या औषधानं वेगवेगळे ५० विकार दूर होतात.

फायकस जातीचा तिसरा आणि लागवडीसाठी सर्वांत जास्त दुर्लक्षिलेला वृक्ष म्हणजे उंबर/औदुंबर. झाडाखाली पाण्याचे स्रोत असणारा व दत्ताचं वसतिस्थान मानला गेलेला हा पूजनीय वृक्ष आहे. नरसिंहानं हिरण्यकश्‍यपूचं पोट फाडल्यानंतर त्याच्या बोटांचा खूप दाह झाला आणि तो शमवण्यासाठी नरसिंहानं आपली बोटं उंबराच्या फळामध्ये खुपसली होती, अशी आख्यायिका आहे. निसर्गतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बागेत उंबराचं झाड असल्यास तिथं पक्षी व खारी यांच्या वसाहती होतात. वृक्षलागवडीमध्ये विविधता ठेवणं आवश्‍यक असतं. शहरांत पर्जन्यवृक्ष, कॉपरपॉड (सोनमोहर), काशिद, आसुपालव (खोटा अशोक) ही ब्रिटिशांनी लावलेली विदेशी झाडं उदंड झाली आहेत. विविधता येण्यासाठी देशी झाडं- शिरीष, पुत्रंजीवी, सीताअशोक, अर्जुन, उंडी, वावळ, करमळ, कदंब, मोह, रोहितक, काटेसावर यांसारख्या देशी झाडांची लागवड होणं खूप गरजेचं आहे. औषधी असलेल्या या झाडांची रोपं शासनाच्या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध होण्याची आवश्‍यकता आहे.  रोपं मिळवण्यासाठी तीन महिने अगोदर नोंदणी केल्यास रोपं उपलब्ध होऊ शकतात. मागणी केल्यास पुरवठा होतो. आंबा, चिंच, करंज, लिंब, सीताफळ, रामफळ यांसारखी फळं देणारी झाडे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होतात. यांची लागवड ग्रामीण भागात करता येईल.
कदंब हा वृक्ष महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात दिसतो. याचं नारंगी रंगाचं गोलाकार फूल असून, फळही गोलाकार तयार होतं. यमुने काही सवंगड्याबरोबर चेंडू खेळ खेळताना कृष्णाने चेंडू म्हणून कदंबाच्या फळाचा वापर केला होता. कालियामर्दन केल्यानंतर कृष्णाच्या शरीराचा खूप दाह झाला व तो शमवण्यासाठी कृष्ण बराच काळ कदंबवृक्षावर जाऊन बसला होता, अशी आख्यायिका आहे. आज याच कदंबवृक्षापासून दाहशामक ॲस्पिरीनसारखं औषध तयार केलं जातं. रोपमळ्यांमध्ये कदंबाची रोपं तयार व्हायला हवीत व महाराष्ट्रात जागोजागी कदंब वृक्ष लावला जायला हवा.

शहरातल्या वृक्षप्राधिकरणाच्या कर्तव्यांमध्ये नवीन झाडं लावू इच्छिणाऱ्या व्यक्तींना बिया, रोपटी व झाडं यांचा पुरवठा करण्यासाठी रोपमळ्यांचा विकास व परीक्षण करणं हे महत्त्वाचं कर्तव्य आहे. महापालिकेकडून वृक्षउपकर घेतला जातो. झाडं लावणं व त्यांचं संरक्षण-जतन यासंबंधी कोणत्याही व्यक्तीला सल्ला देण्याचं व साह्य करण्याचं काम वृक्षअधिकाऱ्यांचं असतं.

शोभिवंत झाडांची लागवड करताना ॲमहरटशिया नोबेलिस (ऊर्वशी), कचनार (रक्तकांचन), सीताअशोक, तामण (जारूल), अमलताश (बहावा), मुसंडा, नागचाफा, सोनचाफा, स्पॅथोडिया (पिचकारीचं झाड), रक्तरोहिडा, अशा अनेक झाडांच्या लागवडीचा विचार करता येऊ शकेल. ॲमहरटशिया नोबेलिस म्हणजेच ऊर्वशी हे जगातलं प्रथम क्रमांकाचं सुंदर झाड समजलं जातं. याला प्राइड ऑफ म्यानमारअसं म्हटलं जातं. या झाडाचं रोप शासनाच्या रोपवाटिकेमध्ये कधीही उपलब्ध नसतं. खासगी रोपवाटिकेमध्ये अधिक किमतीला ते उपलब्ध होऊ शकतं. जांभळी फुलं असलेलं तामण हे देशी झाड (प्राईड ऑफ इंडिया) खेड्यांत; तसंच शहरांत मोठ्या प्रमाणात दिसायला हवीत. तामणच्या फुलाला महाराष्ट्राचं राज्यपुष्पम्हणून गौरवण्यात आलेलं आहे.
स्पॅथोडिया हे मोठ्या आकाराच्या तांबड्या केशरी रंगाच्या फुलाचं झाड आहे. याची कळी होडीच्या आकाराची असते. कळीचं एक टोक नखानं खुडल्यास व कळी दाबल्यास पिचकारी उडते म्हणून याला पिचकारीचं झाडअसंही म्हटलं जातं. याचीही लागवड महाराष्ट्रभर व्हायला हवी.

झाड लावण्याचा सगळ्यात चांगला क्षण २० वर्षांपूर्वीचा होता व त्यानंतरचा सगळ्यात चांगला क्षण आत्ता आहे,’ अशा आशयाची एक चिनी म्हण असून, या म्हणीतलं मर्म लक्षात घेण्याजोगं आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी, आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी, पाऊसमान वाढवण्यासाठी झाडं लावणंयाला पर्याय नाही. प्रत्येक सुजाण नागरिकानं झाडं लावावीत व स्वतःला मी वृक्षरोपकअसं समजावं!


"
वृक्षायन" ® Vrukshayan,A Movement of Plantation C/20 Shivshakti CHS, Near Mayur colony, Kothrud Pune 411038 http://vrukshayan.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

गांडुळ खत -प्रक्रिया