जलसाक्षर गाव


जलसाक्षर गाव

उन्हाळा आला आहे. ज्या गावांमध्ये पाऊस विशेष पडत नाही अशा गावांमध्ये तर या दिवसांत बरेचदा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतोच, पण ज्या गावांमध्ये भरपूर पाऊस पडतो, अशा ठिकाणीही बरेचदा पाणलोटाच्या कामाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांनी पाणलोटाचा अभिनव उपक्रम राबवला, या गावांमध्ये परभणी जिल्ह्यातील गणेशवाडी या गावाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. गावाच्या जमिनीत पाणी अडविण्यासाठी बांध आणि पाणी जिरवण्यासाठी वृक्षारोपणासारखे चांगले उपक्रम या गावाने सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता राबवले. गणेशवाडी हे जेमतेम पन्नास उंबरठ्यांचे गाव.

या गावात आधीच पाऊसमान कमी. पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांचे खूप हाल होत असत. गावात पिण्याच्या पाण्याचाच मोठा प्रश्‍न होता, त्यामुळे लग्नकार्येही होत नव्हती. माणसांना, गुराढोरांना पाणी प्यायलाही नव्हते. जनावरे पाळणेही कठीण झाले होते. महिलांना पाण्यासाठी खूप पायपीट करावी लागायची. या गावातील लोकांनी शासनाकडे पाण्यासंदर्भात खूप तक्रारी केल्या.

त्यानंतर चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणणारी नळ योजना गावात राबवण्यात आली, पण या योजनेचा पाहिजे तसा लाभ या गावाला झाला नाही. त्यामुळे आपल्या पाण्याची सोय या गावातील गावकऱ्यांनी आपणच करायची असे ठरवले. त्या गावात काम करणाऱ्या सामाजिक, आर्थिक विकास संस्थेने या गावातील गावकऱ्यांना पाणलोटाच्या कामासंदर्भात मार्गदर्शन करायचे असे ठरवले.

त्याअंतर्गत गावाच्या शेतीत सामुदायिक विहीर खणायची, असे या गावातील गावकऱ्यांनी ठरवले. त्यासाठी गावात सर्वेक्षण केले. जमिनीची पाहणी केली. सार्वजनिक विहीर खणल्यावर लक्षात आले, की विहिरीला पाणीच लागत नाही, मग विहिरीचा काय उपयोग? गावात "पाणी अडवा-पाणी जिरवा' हा उपक्रम राबविल्याशिवाय गावातील पाण्याचा प्रश्‍न सुटणार नाही, हे गावकऱ्यांना समजले. या गावातील गावकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करत गावात पाणलोटाचे काम करायचे असे ठरवले. "पाणी अडवा पाणी जिरवा' या योजनेसाठी या गावाने अफार्म या संस्थेकडे अर्ज पाठवला.

या संस्थेने या योजनेस मान्यता दिली. त्याचबरोबर चार वर्षांचा कामाचा आराखडा तयार केला. गावामधील आबालवृद्धांनी या योजनेत आनंदाने सहभागी व्हायचे ठरवले. तरुणांनीही उत्साहाने सहभाग घेतला. महिला मंडळांनीही गावात पाणी आणण्यासाठी कामाला सुरवात केली. श्रमदान करून कोणतीही गोष्ट मिळवण्यात मोठा आनंद असतो हे या गावातील लोकांना समजले होते.

त्याचाच परिणाम म्हणजे हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. या गावातील लोक यापूर्वी एकत्रितपणे क्वचितच काम करत, पण पाणलोट क्षेत्र विकासाच्या "पाणी अडवा पाणी जिरवा' या योजनेमुळे एकत्रितपणे काम करण्याचा आनंद आणि त्याचे फायदे या गावातील गावकऱ्यांना समजले.

गावातील प्रत्येक जण या कामासाठी झपाटला गेला. तरुण पिढीही पाण्यासाठी घाम गाळायला सज्ज झाली. गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोटक्षेत्र विकासाच्या कामांतर्गत सलग समतल चर खणले जातात, वनराई, सिमेंटचे बंधारे बांधले जातात. जमिनीत पाणी मुरण्याच्या दृष्टीने झाडे फार महत्त्वाची कामगिरी बजावतात. त्यामुळे गावात पाणी जिरवण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

ओस पडलेल्या सार्वजनिक जागेवर रोपे लावण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी या झाडांमुळे जमिनीत मुरलेच, पण गावाचा हा रखरखीत भाग हिरवागार झाला. हा आपल्या गावात झालेला चांगला बदल पाहून गावकरी भारावून गेले. सिमेंटचे बंधारे बांधले. नालाबंडिंगचे काम करण्यात आले. श्रमदानातून गणेशवाडीत सार्वजनिक विहीर खणली. ही विहीर 32 फूट खोल खोदली.

आश्‍चर्य म्हणजे या विहिरीला 15 फुटांवरच पाणी लागले. खोदकाम, विहिरीचे बांधकाम या सर्व गोष्टी गावकऱ्यांनी स्वतः केल्या. कष्टाचे चीज झाले होते. पण विहीर खणल्यावरही एक महत्त्वाची गोष्ट राहिली होती आणि ती या गावातील ग्रामस्थांच्या आवाक्‍यातील नव्हती. विहिरीतून पाणी घेण्यासाठी पाइपलाइनची आवश्‍यकता होती. या गावातील लोकांच्या कष्टाची कहाणी ऐकून कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी पंप आणि पाइपलाइन टाकून देण्याबाबत या गावाला सहकार्य केले.

त्याअंतर्गत घरोघर नळ आले, त्यातून पाणीही आले. पाण्यासाठी होणारी वणवण संपली. गणेशवाडीच्या या पाणलोट कार्यक्रमाला आता काही वर्षे झाली आहेत. या माध्यमातून गावाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. आपले एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेले गाव आता पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले पाहून प्रत्येक ग्रामस्थांच्या मनावर समाधानाची लकेर उमटताना दिसते.
"वृक्षायन" ®
Vrukshayan,A Movement of Plantation
C/20 Shivshakti CHS,
Near Mayur colony,
Kothrud Pune 411038
http://vrukshayan.blogspot.com/
@Gireesh-9850214645
@Sachin-9822553487
@Vikram-9881063280

Comments

Popular posts from this blog

गांडुळ खत -प्रक्रिया