तापमानवाढ नियंत्रणासाठी वनसंवर्धन - !चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र बनूया!

जागतिक तापमानवाढ आटोक्‍यात आणण्यात वनांचा फार मोठा सहभाग आहे. लोकसंख्या तसेच औद्योगीकरणामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वातावरणात जास्त प्रमाणात निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्‍साइड हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे. पृथ्वीला या महान समस्येपासून वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे.
आधुनिकीकरण व औद्योगीकरण यांचा वेग वाढत असून विश्‍वातील पर्यावरणात प्रदूषणाची बेसुमार वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, त्यातच माणूस जंगलाची बेसुमार तोड करीत आहे. त्यामुळे आज असंख्य समस्यांनी जगाला ग्रासलं आहे. अशा समस्यांपैकी प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) ही सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. वनांच्या तोडीमुळे जागतिक तापमानवाढ कशी होत आहे, याबाबतची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

"ग्लोबल वॉर्मिंग" या महान समस्येपासून पृथ्वीला वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची
गरज आहे.
चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र होऊया....



जागतिक तापमानवाढ -
तापमानवाढ ही जागतिक पर्यावरणीय समस्या आहे. पृथ्वीच्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम पृथ्वीवरील सजीवसृष्टीवर होतो. पृथ्वीच्या या तापमानवाढीस नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटक कारणीभूत आहेत.

ग्रीन हाऊस इफेक्‍ट किंवा हरितगृह परिणाम -
पृथ्वीचे तापमान ज्यामुळे वाढते त्याला "ग्रीन हाऊस इफेक्‍ट' किंवा हरितगृह परिणाम म्हणतात. सूर्यापासून किरणे बाहेर पडतात, त्या किरणांना इन्शुलेशन असे म्हणतात. सूर्यापासून निघणारे अतिनील किरण सजीवसृष्टीस हानिकारक असतात. हे अतिनील किरण पृथ्वीवर येण्यापूर्वी वातावरणात असलेल्या ओझोनच्या थरामुळे अडले जातात. ओझोनच्या थरामुळे सजीवसृष्टीचे रक्षण होते. म्हणून ओझोनच्या थराला पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणतात. संपूर्ण वातावरण पार करून ५१ टक्के सौर ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचते. या सौर ऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उष्ण बनतो. ही उष्णता नंतर वातावरणात जात असल्यामुळे ३० टक्के उष्णता विकिरण पावते. उर्वरित ७० टक्के उष्णता पृथ्वीजवळ राहते. उष्णतेतील समतोल राखण्यासाठी पृथ्वीला यापैकी आणखी काही उष्णता वातावरणात उत्सर्जित करावी लागते. पृथ्वी सूर्यापेक्षा जास्त थंड असल्याने पृथ्वीचे ऊर्जा उत्सर्जित करण्याचे माध्यम प्रकाश स्वरूपात नसून ते इन्फ्रारेड किंवा थर्मल रेडिएशन्स स्वरूपात असते.

कार्बन-डाय-ऑक्‍साईड चे उत्सर्जन कोणत्या कारणांमुळे, किती प्रमाणात होते ते पुढील तक्‍त्यात दिले आहे.
क्‍लोरफ्लूरो कार्बन (CFC) -
क्‍लोरफ्लूरो कार्बनचे निर्माण रासायनिक अभिक्रियेद्वारा होते. क्‍लोरफ्लूरो कार्बन वातावरणातील ओझोनच्या थरास घातक ठरतो. क्‍लोरफ्लूरो कार्बनमुळे ओझोनचा थर विरळ होत आहे. ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे भविष्यात सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे विना अडथळा पृथ्वीवर येऊन सजीवसृष्टीचा विनाश होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. क्‍लोरफ्लूरो कार्बनचा वापर रेफ्रिजरेटर, एरोसोल एअर कंडिशनर, फोम-रेग्जीन, स्प्रे, अग्निशामक द्रव्यांमध्ये व रासायनिक उद्योगांत मोठ्या प्रमाणावर केला जातो.

मिथेन (CH4) -
मिथेन हा कार्बन व हायड्रोजनच्या संयोगातून बनला आहे. वातावरणातील त्याचे प्रमाण अतिशय नगण्य म्हणजे ०.०००२ टक्के इतके आहे. हरितगृह वायूंच्या प्रमाणात जी वाढ होऊन तापमानात वाढ होत आहे. त्यासाठी मिथेन १८ टक्के जबाबदार आहे. मिथेनचा प्रत्येक रेणू कार्बन-डाय-ऑक्‍साईडच्या तुलनेत २५ पट जास्त उष्णता शोषून घेतो. त्याच्या निर्मितीनंतर तो एक ते दहा वर्षे टिकतो. बॅक्‍टेरियाच्या जैविक क्रिया, पशुपालन, गाईंच्या शेणातून, भात शेतीतून, कोळशाच्या खाणी, खनिज तेल व नैसर्गिक वायूंच्या खाणी, जैविक पदार्थांचे ज्वलन यांसारख्या क्रियेतून वातावरणात मिसळतो.

नायट्रस ऑक्‍साईड -
नायट्रस ऑक्‍साईड हा वायू जैविक पदार्थ व जीवाश्‍म इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होतो. सन १७५० ते २००० या कालावधीत या वायूत १७ टक्‍केने वाढ झाली आहे. वातावरणात या वायूचे प्रमाण अतिशय कमी असले तरी ले२ पेक्षा ३२० पटीने अधिक धोकादायक आहे. जागतिक तापमान वाढीत या वायूचे सहा टक्के योगदान आहे. निर्माण झाल्यानंतर हा १५० वर्षे टिकतो.

हेलोन -
हेलोन हे ग्रीन हाऊस प्रभाव निर्माण करणारे एक रेडिओधर्मी तत्त्व आहे. हेलोन १३०१ आणि हेलोन १२११ यांचा उपयोग अग्निशामक उपकरणांमध्ये, विमानांमध्ये होतो. याचा जीवनकाल क्रमशः २५ ते ११० वर्षे आहे. ओझोनच्या थरास घातक ठरतो.

हरितगृह वायूंचे उत्सर्जन करण्यामध्ये विकसित देश अग्रभागी असून २/३ भाग उत्सर्जित करतात. णडअ २५ ते ३० टक्के हरितगृह वायू उत्सर्जित करते. रूसचे १५ टक्के योगदान आहे. विकसनशील देशांमध्ये चीन अग्रभागी असून १२ टक्के वायू उत्सर्जित करतो, तर भारत तीन टक्के उत्सर्जन करतो.

वातावरणात पृथ्वीभोवती काही वायूंचे ब्लॅंकेटसारखे आवरण बनले आहे. ते वायूही पृथ्वीकडून उत्सर्जित झालेली उष्णता शोधून घेतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान उष्ण बनते. जे वायू ही उष्णता शोषून घेतात त्यांना हरितगृह वायू असे म्हणतात. या वायूंमध्ये १) कार्बन-डाय-ऑक्‍साईड (CO2), २) मिथेन (CH4), ३) ओझोन (O3), ४) नायट्रस ऑक्‍साईड, ५) क्‍लोरोफ्लोरो कार्बन (CFC), ६) हेलोन इत्यादींचा समावेश होतो.

वातावरणातील हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट हे या समस्येचे मूळ आहे, असं म्हणता येईल. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्यासाठी कृषिमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागते. पण शेतजमीन अपुरी पडत असल्यामुळे जंगलांची बेसुमार तोड करून ती जमीन शेतीसाठी वापरली जात आहे. वाढते औद्योगीकरण व शहरीकरण यामुळेही वनांची तोड केली जात आहे. वृक्षारोपण व वनसंवर्धन याकडे समाजाचे दुर्लक्ष वाढल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हरितगृह वायूंच्या वाढीची कारणे -
वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानवाढीचा धोका संभवतो आहे. जागतिक तापमान वाढीस मुख्यतः कार्बन-डाय-ऑक्‍साईड, नायट्रस ऑक्‍साईड, क्‍लोरोफ्लोरो कार्बन, हेलोन, मिथेन हे वायू जबाबदार आहेत. वातावरणातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी मानवनिर्मित घटक कारणीभूत ठरतात.

कार्बन-डाय-ऑक्‍साइड (CO2) -
आयपीसीसीच्या अहवालानुसार जागतिक तापमान वाढीत कार्बन-डाय-ऑक्‍साइड चा ७२ टक्के वाटा आहे. हा वायू मानवी व्यवहारातून निर्माण होतो. कार्बन-डाय-ऑक्‍साईड निर्माण झाल्यानंतर ५०० वर्षे टिकतो. कार्बन-डाय-ऑक्‍साईड हा मुख्यत्वे करून जीवाश्‍म इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होतो. तसेच प्राण्यांच्या श्‍वसनातून, ज्वालामुखीचा उद्रेक, वनस्पतींचे सडणे यांसारख्या प्रक्रियेतूनसुद्धा निर्माण होतो. औष्णिक वीज निर्मिती केंद्र, स्वयंचलित वाहनांतील पेट्रोल, डिझेलचे ज्वलन विविध कारखाने यातून सुद्धा कार्बन-डाय-ऑक्‍साइड मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो.

ओझोन थराचे कार्य -
वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६ ते २० कि.मी. अंतरावर पृथ्वीच्या सभोवताली ओझोन वायूचा जाड थर आढळतो. सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे या थरापासून अडली जातात. पण मागील काही दशकांपासून मानवी व्यवहारातून CO2, CFC मिथेनसारखे हरितगृह वायू वातावरणात प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने ते ओझोनच्या थरास घातक ठरत आहेत. अंटार्टिका खंडावर काही ठिकाणी ओझोनच्या थरास छिद्र तयार झाले आहे. त्यास Ozone Depletion असे म्हणतात. अंटार्टिकावरील या छिद्रामुळे तेथील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे महासागरांच्या पातळीत वाढ होत आहे. ओझोनचा थर विरळ झाल्याने अतिनील किरणे पृथ्वीवर येऊन तापमानात तर वाढ होईलच, पण त्वचेचा कॅन्सर, मोतीबिंदूसारखे आजारही वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.



(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

Ref: SAKAL Papers
"ग्लोबल वॉर्मिंग" या महान समस्येपासून पृथ्वीला वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची
गरज आहे.


चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र होऊया....

Comments

Nikhil said…
excellent and very well explained info....

Popular posts from this blog

गांडुळ खत -प्रक्रिया