गुढीपाडवा, कडुनिंब वाढवा प्रकाश ठोसरे, अरविंद आपटे
कडुनिंबाच्या अर्कामुळे कीटकांच्या अंडी, अळी, कोष अशा विविध अवस्थांच्या वाढीस वेगवेगळ्या प्रकारे अडथळे निर्माण होतात, त्यांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कडुनिंबाचा वापरास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. कडुनिंब (Azadirachta indica) या वृक्षाचे मूळ स्थान भारतीय उपखंड, ब्रह्मदेश आहे. महोगनी कुळातील हा वृक्ष १५-२० मी., क्वचितप्रसंगी ३५-४० मी. उंच वाढतो. जवळपास वर्षभर हरित राहणारा वृक्ष चांगलाच काटक आहे. कडुनिंब जवळपास सर्व प्रकारच्या माती प्रकारात वाढू शकतो. चांगली निचरा होणारी वालुकामय जमीन जास्त मानवते. राजस्थान, विदर्भासारख्या कडक उन्हाळ्याच्या प्रदेशात ४५ ते ४७ अंश तापमानही तो सहन करू शकतो. वऱ्हाडात महत्त्वाच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हे वृक्ष दिमाखाने उभे असून, ते कडक उन्हाळ्यातही वाटसरूंना शीतलता देतात; मात्र चार अंश सेल्सिअसखालचे तापमान त्याला मानवत नाही. थंडी, धुक्यामुळे मोठाले वृक्षही करपून जातात. बहुपयोगी वृक्ष कडुनिंब हा वृक्ष "दैवी वृक्ष,' "रोगनिवारक,' "निसर्गाचा दवाखाना,' "खेड्यातला दवाखाना' समजला जातो...